महाबळेश्‍वर- हॉटेलमध्ये दोन दिवसांपासून पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास

Share this post on:

सातार, 31 जुलै (हिं.स.) महाबळेश्‍वर शहरापासून 3 कि.मी. अंतरावर महाबळेश्‍वर-प्रतापगड रस्त्यावर असलेल्या पार्कयार्ड हॉटेलमध्ये दोन दिवसांपासून रहिमतुल्ला नदीम इस्माईल (वय 33, रा. ए. टी. चांदणी चौक, कराची पाकिस्तान) हा पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास होता. परंतु, याबाबतची माहिती हॉटेल मालक व व्यवस्थापक यांनी स्थानिक पोलिस ठाण्यास देणे बंधनकारक असतानाही त्यांनी ती न दिल्याने हॉटेल मालक व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची लेखी तक्रार पो. हवा. आर. बी. मोरमारे यांनी महाबळेश्‍वर पोलिस ठाण्यास दिली. या तक्रारीवरून पार्कयार्ड हॉटेलचे मालक  तबरेज इकबाल सय्यद वय 43 व व्यवस्थापक फारूक हशम वारुणकर वय 46 रा. महाबळेश्वर यांच्यावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हा पाकिस्तानी नागरिक  19 जुलै 2019 रोजी भारतात आला. तो भायखळा मुंबई येथेही वास्तव्यास होता. याची माहिती महाबळेश्वर पोलिसांना मिळाली होती. महाबळेश्वर शहराजवळ असलेल्या द पार्क यार्ड या रिसॉर्टमध्ये  27 जुलैपासून रहिमतुल्ला नदीम ईस्माईल वय 33 रा. ए टी चांदणी चौक,कराची हा पाकिस्तानी नागरिक रूम नंबर 212 मध्ये वास्तव्यास असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. महाबळेश्‍वर पोलिसांनी तेथे जाऊन खात्री केली. या परकीय नागरिकाची माहिती हॉटेल मालक व व्यवस्थापकांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यास 24 तासामध्ये कळवणे बंधनकारक होते. मात्र, दोन दिवसांमध्ये त्यांनी ही माहिती पोलिसांना कळवली नाही. वास्तव्यासाठी  परकीय नागरिकाच्या आगमनाबाबतचा सी फॉर्म भरून पोलिस ठाणे अथवा पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा यांना तो सादर करणे गरजेचे असताना तो सादर करण्यात आला नाही. पोलिसांना कोणत्याही प्रकारची माहिती न दिल्याने याबाबतची लेखी तक्रार पो हवा आर बी मोरमारे यांनी महाबळेश्‍वर पोलीस ठाण्यास दिली. या तक्रारीवरून पार्कयार्ड हॉटेलचे मालक तबरेज इकबाल सय्यद व व्यवस्थापक फारूक हशम वारुणकर यांच्यावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हॉटेल व्यवस्थापनाची बेफिकिरी

महाबळेश्‍वरमध्ये पर्यटनाला आलेल्या पर्यटकांचे ओळखपत्र घेतल्याशिवाय कोणत्याही हॉटेलमध्ये राहण्यास परवानगी देऊ नये, असे स्पष्ट निर्देश हॉटेल व्यवस्थापनास मागील काही घटनांमुळे जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. ओळखपत्राशिवाय प्रवेश दिल्याने एका हॉटेल व्यावसायिकावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. सुरक्षेच्या दृष्टीने ओळखपत्र आवश्यक असतानादेखील हॉटेल व्यवस्थापन याबाबत बेफिकीर असल्याचे या प्रकरणाने पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे.

Share this post on: